गडचिरोली: स्वातंत्र्यानंतर प्रथमच मरकणार गावात एस.टी. बस

62

– गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांना यश; नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत बसचं जल्लोषात स्वागत
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम मरकणार गावात एस.टी. बस पोहोचली असून, या ऐतिहासिक क्षणाचा गावकऱ्यांनी जल्लोषात आणि राष्ट्रध्वज फडकवत आनंदोत्सव साजरा केला. गडचिरोली पोलीस दल व राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त प्रयत्नातून आजपासून मरकणार–अहेरी बससेवेची औपचारिक सुरुवात झाली आहे.
भामरागड उपविभागातील अबुझमाडच्या पायथ्याशी वसलेले मरकणार हे गाव छत्तीसगड सीमेपासून अवघ्या ६ कि.मी. अंतरावर असून अत्यंत दुर्गम परिसरात आहे. याआधी येथील नागरिकांना कोठीपर्यंत पायी प्रवास करूनच बससेवेचा लाभ घ्यावा लागत होता. आता सुरू झालेल्या बससेवेचा थेट लाभ मरकणार, मुरुमभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयारकोठी, गुंडूरवाही या गावांतील सुमारे १२०० नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि प्रवाशांना होणार आहे.
बससेवेचे उद्घाटन गावपाटील झुरु मालू मट्टामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीआरपीएफ ३७ बटालियन जी कंपनीचे असिस्टंट कमांडंट अविनाश चौधरी, पोलीस स्टेशन कोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. दिलीप गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ करण्यात आली. पोलीस दलाकडून नागरिकांना मिठाईचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
या उपक्रमाची पार्श्वभूमी महत्त्वपूर्ण आहे. गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात आलेल्या नागरी कृती उपक्रमांमुळे मरकणार गावातील नागरिकांनी दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी नक्षल गावबंदी ठराव एकमताने मंजूर करून माओवाद्यांना मदत न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर या भागातील विकासास गती मिळाली असून कोठी–मरकणार रस्ता पोलीस संरक्षणात पूर्ण झाला असून मरकणार–मुरुमभुशी रस्ता प्रगतिपथावर आहे. यासोबतच मरकणार गावात एअरटेल मोबाईल टॉवर देखील उभारण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या सुरक्षा आणि सहकार्यामुळे ४२०.९५ कि.मी. लांबीचे २० रस्ते आणि ६० पूल बांधण्यात आले असून यामुळे दुर्गम भागात वाहतूक व संपर्क व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
हा उपक्रम पोलीस अधीक्षक ल नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, प्रशासनाचे अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज जी., उपविभागीय अधिकारी अमर मोहिते व पोउपनि. दिलीप गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीआरपीएफ व जिल्हा पोलीस दलाच्या अथक प्रयत्नातून साकार झाला आहे.
या बससेवेमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नसून, पोलीस व जनतेतील परस्पर विश्वास व संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #मरकणारबस #गडचिरोलीविकास #दुर्गमगावसेवा #पोलीससहकार्य #अबुझमाड #एसटीबसगावात #माओवादमुक्तगडचिरोली #जनतापोलीसबंध #MarkanarBusService #GadchiroliPolice #ConnectingRemoteVillages #STBusInAbujhmad #FirstBusAfterIndependence #NaxalFreeZone #AbujhmadDevelopment #PolicePublicPartnership

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here