– आत्मनिर्भरतेकडे यशस्वी वाटचाल
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १२ : “आम्ही आमच्या आरोग्यासाठी” संस्थेच्या पुढाकाराने कुरखेडा येथे दिव्यांग युवक-युवतींसाठी १५ दिवसीय निवासी रोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम २३ जून ते ०७ जुलै २०२५ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षणाचा उद्देश दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयुक्त कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर व रोजगारक्षम बनविणे हा होता. एकूण २४ दिव्यांग विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रशिक्षणाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना संस्थेची ओळख, उद्दिष्टे व कार्यपद्धती यांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर सॉफ्ट स्कील्स, लाईफ स्कील्स, संगणक ज्ञान व कार्यक्षेत्राशी संबंधित इंग्रजी संवाद कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. रिटेल, बीपीओ, हॉस्पिटॅलिटी, ई-कॉमर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांनुसार तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले. रिटेल क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी विशेष एक्सपोजर विजिट आयोजित करण्यात आली, तसेच मॉक इंटरव्ह्यूद्वारे प्रत्यक्ष नोकरी प्रक्रियेची तयारी करून घेण्यात आली.
या कार्यक्रमात विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्ये, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्यात आली. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संगीता तुमडे यांनी RPWD कायदा २०१६ अंतर्गत दिव्यांगत्वाच्या प्रकारांविषयी, तसेच शासकीय योजना, सवलती आणि सामाजिक अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली. मनोज मेश्राम यांनी उच्च शिक्षण व करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन करत डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्सेसमधून मिळणाऱ्या व्यावसायिक संधींचे महत्व स्पष्ट केले. अमीर तुराळे यांनी दिव्यांग व्यक्तींच्या वास्तव जीवनातील संघर्ष व स्वावलंबनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे प्रभावीपणे मांडले.
संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार यांनी “व्यक्ती शरीराने दिव्यांग असली तरी तिची विचारशक्ती सकारात्मक आणि सक्षम असावी,” या विचाराची प्रभावी मांडणी करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या सत्रात माहिती पुस्तिका आणि वर्कबुक्सही वितरित करण्यात आले.
दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार व कौशल्य विकास विषय समन्वयक सपन वाघमारे यांनी प्रशिक्षण घेतलेल्या क्षेत्रांतील नोकरीच्या संधी, पात्रता आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. प्लेसमेंट ऑफिसर दीपाली फुंडे यांनी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि विविध कंपन्यांमधील संधींबाबत माहितीपर सत्र घेतले. संपूर्ण प्रशिक्षण सत्राचे मुख्य मार्गदर्शन प्रशिक्षिका मोनाली मेश्राम यांनी केले.
समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांची मांडणी केली. यावेळी सपन वाघमारे, नितेश राऊत आणि मोनाली मेश्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये कार्यक्रम निदर्शक मुकेश शेंडे, प्रकल्प व्यवस्थापक मनोज मेश्राम, विषय समन्वयक सपन वाघमारे, प्रशिक्षिका मोनाली मेश्राम आणि नितेश राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दिव्यांग युवकांना सक्षम बनवून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, कुरखेडा येथील हा कार्यक्रम त्यांच्या स्वावलंबनाच्या वाटचालीत मोलाचा टप्पा ठरला आहे.

#thegdv #thegadvisha #gadchirolinews #kurkhedanews #DisabilityInclusion #SkillDevelopment #VocationalTraining #YouthEmpowerment #InclusiveEducation #AccessibleOpportunities #RPWDAct2016 #KurkhedaInitiative #EmpoweringPWDs #LivelihoodTraining #DigitalSkills #SoftSkillsTraining #SelfReliance #EqualOpportunities #JobsForPWDs
#दिव्यांग_शिक्षण #कौशल्यविकास #रोजगारप्रशिक्षण #आपल्या_आरोग्यासाठी #स्वावलंबन #कुरखेडा_प्रशिक्षण #दिव्यांग_युवक #समावेशकविकास #RPWD2016 #SkillDevelopmentForAll #EmpowermentThroughSkills