The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.०८ : अंगारा येथील रहिवासी त्रिभुवन तुकाराम बाळबुद्धे यांचे मागण्या मान्य होईपर्यंत सुरू असलेले अमरण उपोषण आज आठव्या दिवशीही सुरूच असून, यामुळे तालुका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ३० जूनपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणात ५ जुलै रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बाळबुद्धे यांनी रुग्णालयात नेण्यामागे प्रशासनाचा दडपशाहीचा डाव असल्याचा आरोप करत उपोषण पुन्हा सुरू केले आहे.
बाळबुद्धे यांनी मागण्यांबाबत ठाम भूमिका घेतली असून, दि. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या बेकायदेशीर फेरफार रद्द करून न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या भूमिकेमुळे प्रशासन अडचणीत आले असून, तहसीलदारांनी पत्राद्वारे मध्यस्थी व कायदेशीर प्रक्रियेचा सल्ला दिला आहे.
बाळबुद्धे यांनी महसूल विभागावर चुकीच्या कार्यवाहीचे आरोप लावत, मृत्युपत्रातील कागदपत्रांचा अपुरा उपयोग, खोटे अर्ज, अपिलावर निर्णयाची विलंब याबाबत संताप व्यक्त केला आहे. यासोबतच नुकसान भरपाई, मालमत्तेची हिस्सेवाटणी, खरेदी व्यवहाराची रक्कम वसूल करून देणे आदी मागण्या त्यांनी मांडल्या आहेत.
स्थानिक नागरिकांनीही बाळबुद्धे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपोषण स्थळावरील साहित्याची अफरातफर व बळजबरीने रुग्णालयात नेण्याच्या प्रकारामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करून निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोलीपाऊस #मुसळधारपाऊस #DesaiganjRainfall #कोरचीपावसाचीनोंद #तालुकावारपाऊस #GadchiroliWeatherUpdate #VeryHeavyRainfall #RainAlertGadchiroli #पावसाचाआढावा #गडचिरोलीजिल्हा