कुरखेडा : दोन सख्ख्या मावस भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

632

कुरखेडा : दोन सख्ख्या मावस भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
– परिसरात हळहळ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०६ : शिरपूर शेतशिवारातील शेततळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतकांची नावे विहान ज्ञानेश्वर मडावी (१२) रा. शिरपूर व रूदय ज्ञानेश्वर मडावी (९) रा. कुरखेडा (मूळ गाव – चातगाव, ता. धानोरा, सध्या रा. गडचिरोली) अशी आहेत. दोघेही आज सुट्टी असल्याने शेजारील नाजूक मडावी यांच्या शेतातील शेततळ्याकडे गेले होते. तळ्याचे थोडेफार पाणी पाहून दोघांनी आंघोळीसाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तळ्याजवळ गेल्यावर सायकल, कपडे व चपला पाळीवर दिसून आल्या. पाण्यात निरखून पाहिल्यानंतर दोघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. तात्काळ पोलीस पाटील विश्वनाथ रामटेके यांनी कुरखेडा पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे हलवण्यात आले.
विहान मडावी हा शिवाजी हायस्कूल, कुरखेडा येथे इयत्ता ७वीत शिक्षण घेत होता. त्याचे वडील शिक्षक आहेत. तर रूदय मडावी गडचिरोली येथे शिक्षण घेत होता. त्याचे वडील गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असून रूदय सध्या शिरपूर येथे मावशीकडे पाहुणा म्हणून आला होता.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews #TragicDrowning #FarmPondAccident #CousinsDrowned #ShirpurIncident #KurkhedaNews #ChildDrowning #Gadchiroli #AccidentalDeath #EmotionalLoss #RuralTragedy
#शेततळ्यातबुडूनमृत्यू #दुर्दैवीघटना #शिरपूर #कूरखेडा #मावसभावांचेमृत्यू #गडचिरोली #बालमृत्यू #शोकांतिका #शेततळ्याचाअपघात #पोलीसकारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here