– एक गाव एक वाचनालयांतर्गत जिल्ह्यातील ७१ ठिकाणी सराव परीक्षा; आतापर्यंत २४,२०० विद्यार्थ्यांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ० ५ : गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” उपक्रमाअंतर्गत आणि “यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई” यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सराव पेपर क्र. ०७ चे आयोजन करण्यात आले.
ही परीक्षा जिल्ह्यातील पोलीस ठाणे, उपपोस्टे, पोलीस मदत केंद्र आणि “एक गाव एक वाचनालय” योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ७१ वाचनालयांमध्ये एकाचवेळी घेण्यात आली. या सराव परीक्षेत एकूण ४२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तर आजवर घेतलेल्या सात टेस्ट सिरीजद्वारे एकूण २४,२०० विद्यार्थ्यांना मोफत सरावाची संधी मिळाली आहे.
या उपक्रमांतर्गत दुर्गम भागांतील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा येथील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र पेनगुंडा हद्दीतील २०, नेलगुंडा हद्दीतील १५ व कवंडे येथील ५ विद्यार्थ्यांनीही परीक्षेत भाग घेतला.
गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयातील शहीद पांडु आलाम सभागृहात १८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे मनोबल वाढवले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, पोलीस उप अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखा व पोउपनि चंद्रकांत शेळके व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
“प्रोजेक्ट उडान” उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा आत्मविश्वास मिळत असून, गडचिरोली जिल्ह्याला नव्या यशोशिखरांकडे नेण्याची दिशा या माध्यमातून तयार होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews