घाटी ग्रामसभेचा आक्रमक इशारा : ट्रॅक्टर न सोडल्यास तीव्र आंदोलनाची तयारी

131

– पेसा, वनहक्क आणि निस्तार कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप; ७ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०५ : तालुक्यातील घाटी येथील ग्रामसभेने मंडळ अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरची त्वरित सुटका न झाल्यास येत्या ७ जुलैपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
२३ जून रोजी ग्रामसभेच्या मंजुरीनुसार घरकुलासाठी सती नदीतून रेती वाहतूक करत असलेला त्रीकांत कोकोडे यांचा ट्रॅक्टर, कोणतीही पूर्वसूचना न देता मंडळ अधिकारी किरंगे यांनी जप्त केला व कुरखेडा तहसील कार्यालयात पाठवला.
ग्रामसभेच्या मते, ही कारवाई पेसा कायदा १९९६, वनहक्क कायदा २००६ व निस्तार हक्क कायदा १९६६ चा सरळ उल्लंघन आहे. पेसा कायद्याच्या कलम २०, २१ आणि ३२(२) नुसार ग्रामसभेला गौण खनिजांवर नियंत्रणाचा विशेष अधिकार आहे. या आधारे, ग्रामसभेने सती नदीतील रेती मोफत वापरण्याचा ठराव घेतला होता.
२४ जून रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिल्यानंतरही काहीच उत्तर न मिळाल्याने २६ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामसभेच्या अधिकारांची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत उत्तर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १ जुलैपर्यंत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हनुमान मंदिरात झालेल्या ग्रामसभा बैठकीत उपोषणाचा ठराव करण्यात आला.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, २००५ पासून “आमच्या गावात आमचे सरकार” ही संकल्पना गिताचार्य तुकाराम दादांच्या प्रेरणेने प्रभावीपणे राबवली जात आहे. मंडळ अधिकाऱ्यांनी ग्रामसभेचा अवमान केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून, ट्रॅक्टरची सुटका न झाल्यास कायदेशीर लढाई सुरू केली जाईल, असा निर्धार करण्यात आला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews
#GhatitolaGramSabha #PESAAct #ForestRightsAct #SandMiningRights #TractorSeizure #KurkhedaNews #GadchiroliUpdates #VillageProtest #LocalSelfGovernance #AamchaGaavAamcheSarkar
#घाटी_ग्रामसभा #पेसा_कायदा #गौणखनिज_हक्क #ट्रॅक्टर_जप्ती #गडचिरोली_आंदोलन #कुरखेडा_बातमी #वनहक्क_कायदा #ग्रामसभा_उपोषण #स्थानीक_हक्क #आमच्या_गावात_आमचे_सरकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here