गडचिरोली पोलिसांचे उत्कृष्ट कार्य : ७२ हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल तक्रारदारांना परत

45

– ११ लाखांहून अधिक किंमतीच्या मोबाईलचा यशस्वी शोध; सायबर पोलिसांची प्रभावी कामगिरी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सायबर पोलिस ठाण्याने पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी बजावत, हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल 72 मोबाईल फोन शोधून काढून त्यांची एकूण ११,११,६००/- रुपयांची मालमत्ता मूळ तक्रारदारांना परत केली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये संबंधित तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पोलिस विभागाकडून अशा मोबाईलचा तातडीने शोध घेणे अत्यावश्यक बनले आहे. ceir.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवल्यास पोलिसांना शोध प्रक्रियेत मदत होते, असे आवाहन यावेळी नीलोत्पल यांनी नागरिकांना केले.
२०२४ मध्ये गडचिरोली सायबर पोलीस ठाण्याने ११९ मोबाईल शोधून तक्रारदारांच्या हाती सुपूर्द केले होते. २०२५ मध्ये आतापर्यंत १२५ मोबाईल फोन पुनर्प्राप्त करण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत अंदाजे १९,६७,१६१/- रुपये इतकी आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, व गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी – नेहा हांडे, वर्षा बहिरवार, संजिव लेंडगुरे, दिवाकर तनमनवार, भूषण गलगट, राहुल शिवरकर, प्रणय नाकाडे, अंकुश बोधनकर या यशस्वी शोध मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.
मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास घाबरू नका. ceir.gov.in वर तक्रार नोंदवा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. आपल्या सहकार्यामुळे मोबाईलचा गैरवापर टाळता येतो आणि हरवलेले मोबाईल पुन्हा मिळू शकतात.
गडचिरोली पोलिसांचे हे कार्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास अधिक बळकट करणारे ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here