– शेतातच मृत्यू; ग्रामस्थांत संताप
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. ०३ : तालुक्यातील आमगाव येथील शेतकरी गिरीधर मारोती कुथे (वय ४७) यांचा विजेच्या तारेचा स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. शेतात काम करत असताना वादळी वाऱ्यांमुळे जमिनीवर पडलेली विद्युत तारे न दिसल्याने कुथे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.
गिरीधर कुथे हे आपल्या शेतामध्ये सावंगी नाल्याजवळ बेलण मारण्याचे काम करत होते. दरम्यान, परिसरात वादळी वारे आणि पावसामुळे विद्युत खांबावरील तारा तुटून शेतात पडली. तारा लक्षात न आल्याने त्यांचा स्पर्श कुथे यांना झाला आणि त्यातच जागीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने देसाईगंज पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी बहुल भागात विद्युत पुरवठ्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याआधीही तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या व उघड्या तारांमुळे अनेक दुर्घटना घडल्या असून, विद्युत विभागाचे दुर्लक्ष कायम चर्चेचा विषय ठरत आहे.
आमगाव येथील या घटनेमुळे ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice