– सहा दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर हौतात्म्य
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०३ : तालुक्यातील खरकाडी येथील शेतकरी दयाराम सुकलू नैताम (वय ५३) यांनी २७ जून रोजी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर सहा दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर २ जुलै रोजी त्यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
कीटकनाशक प्राशनाची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून प्रकृती गंभीर असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दयाराम नैताम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून, आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. घरगुती वादाचे कोणतेही कारण समोर न आल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
पोलीस विभागाने आवश्यक पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अंत्यसंस्कार खरकाडी येथे पार पडले.

शेती संकटांचे सावट कायम
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. दयाराम नैताम यांचा मृत्यू हे ग्रामीण जीवनातील अस्थिरतेचे, तणावाचे आणि अपयशी धोरणांचे गंभीर प्रतिबिंब मानले जात आहे.
अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
#धानोरा #खरकाडी #शेतकरीआत्महत्या #कृषिकष्ट #GadchiroliNews #FarmerSuicide #RuralCrisis #MentalHealthInFarming #कीटकनाशकप्राशन #शेतकरीमृत्यू #AgrarianDistress #MaharashtraNews