– जादूटोणा विरोधी समितीची आढावा बैठक , बोगस डॉक्टरांवर संयुक्त धाडसत्राचे आदेश
The गडविश्व
गडचिरोली, ०२ : “आजारावर जादूटोणा नाही, तर अधिकृत उपचारच पर्याय”, हा संदेश ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार व अंमलबजावणीसंदर्भातील जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अति. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा म्हणाले, “आजही अनेक नागरिक आजारी पडल्यावर वैद्यकीय मदतीऐवजी भोंदू पुजाऱ्यांकडे जातात. या अंधश्रद्धेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येतो. ही प्रथा मोडून काढण्यासाठी महसूल, पोलीस व आरोग्य विभागाने एकत्रित जनजागृती मोहीम राबवावी. शाळांमधूनही या विषयावर माहिती देण्यात यावी.”
त्यांनी आशा वर्कर, पोलीस पाटील, ग्रामसेवक व तलाठ्यांना अशा घटनांची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचे निर्देश दिले. कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि कोरची तालुक्यांमध्ये विशेष लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली.
बैठकीत बोगस डॉक्टरांच्या वाढत्या समस्येवर चर्चा करताना, अशा व्यक्तींविरोधात पोलीस व तालुकास्तरीय समित्यांनी संयुक्त धाडसत्र राबवावे, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीस विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
या निर्णयांमुळे ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलनास चालना मिळण्यासह आरोग्य सुविधा अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहेत.

#HealthAwareness #AntiSuperstition #Gadchiroli #DistrictCollectorPanda #RuralHealthcare #BogusDoctors #MedicalAwareness #SuperstitionFreeSociety #JadutonaMukta #HealthEducation #JointRaids #PublicHealthSafety #गडचिरोली #अंधश्रद्धा निर्मूलन #वैद्यकीयजागरूकता