कुरखेडा : सतीनदीत दुचाकीसह वाहणाऱ्या इसमाचा धाडसी बचाव

1204

– मजूर आणि युवकांनी दाखवली जीवाची बाजी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०१ : येथीलसतीनदीवर एक हृदय हेलावणारी घटना सोमवार, ३० जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली. नदी दुथडी भरून वाहत असताना एका इसमाचा पुराच्या प्रवाहात दुचाकीसह वाहून जाण्याचा प्रसंग ओढवला. पण सुदैवाने, पुलाच्या बांधकामस्थळी कार्यरत असलेल्या मजुरांनी आणि काही जागरूक युवकांनी वेळीच हस्तक्षेप करत धाडसी बचाव करून त्याचे प्राण वाचवले.
सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सतीनदी दुथडी भरून वाहत आहे. येथील नवीन पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता म्हणजेच एक रपटा तयार करण्यात आला होता. परंतु त्या रपट्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू होता. अशा स्थितीत एक इसमाने आपल्या दुचाकीने रपटा पार करण्याचा धोका पत्करून पुढे गेला.
मात्र, अंदाज चुकला! रपट्यावरून घसरून तो दुचाकीसह थेट नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहू लागला. काही क्षणांतच तो नदीच्या मध्यभागी पोहचून एका मोठ्या दगडाला अडकला. ही थरारक दृश्ये जवळच पुलाचे काम करणाऱ्या मजुरांच्या नजरेस पडताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दोरखंड घेऊन मदतीला धाव घेतली. जीवनाचा धोका पत्करून पाण्यात उतरले आणि त्या इसमाला सुरक्षित बाहेर काढले.
बचावकार्य सुरू असताना नदीकाठावर उपस्थित काही स्थानिक युवकांनीही धाव घेतली आणि संपूर्ण प्रयत्नात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या त्वरित प्रतिसादामुळे या कर्मचाऱ्याचा जीव वाचला. मात्र दुचाकी खोल पाण्यात बुडाली असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर प्रशासनाच्या भोंगळ नियोजनावर तीव्र टीका होत आहे. नदीला पूर आलेला असूनही पर्यायी रस्ता खुला कसा ठेवण्यात आला? चेतावणी फलक, अडथळे किंवा सुरक्षा कर्मचारी का नेमले नव्हते? अशा असुरक्षित ठिकाणी सार्वजनिक हालचाली रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना का करण्यात आली नाही? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.
दरम्यान सदर इसम कूरखेडा येथील एका शासकीय विभागात कार्यरत असल्याचे समजते, मात्र बातमी प्रसिद्ध होईपर्यंत त्याचे नाव समजू शकले नाही.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews #कूरखेडा #सतीनदी #धाडसीबचाव #पूरस्थिती #नदीतवाहिला #प्रशासनाचीनिष्काळजी
#स्थानिकमजूर #शासकीयकर्मचारी #मराठीतबातमी #ब्रेकिंगन्यूज #PurvarilTharar #RescueOperation #FloodAlert #MaharashtraNews #LokanchiShakti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here