भूसंपादन आणि खाणीविरोधात संघर्षाची नांदी : आरमोरीत उद्या सर्वपक्षीय बैठक

59

The गडविश्व
आरमोरी, दि. २५ : गडचिरोली जिल्ह्यात बेकायदेशीर लोहखनन, बळजबरी भूसंपादन आणि विनाशकारी प्रकल्पांविरोधात निर्माण झालेल्या जनआक्रोशाला दिशा देण्यासाठी उद्या गुरुवारी (ता. २७) दुपारी १२ वाजता आरमोरी येथील साई दामोदर मंगल कार्यालयात सर्वपक्षीय जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीतून व्यापक संघर्षाची दिशा ठरवली जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची व एट्टापल्ली तालुक्यांत कायदे-सुव्यवस्थेचा भंग करीत लोहखाण्यांचे उत्खनन सुरू असून, आष्टी-कोनसरी, मार्कंडा-भेंडाळा व कुरुड-कोंढाळा परिसरात खासगी कारखानदारांसाठी एमआयडीसी प्रकल्पांच्या नावाखाली सुपीक शेतीभूमी बळजबरीने संपादित केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असून, स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र असंतोष आहे.
विकासाच्या नावाखाली होणाऱ्या या अन्यायकारक भूसंपादनामुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अपघातांची संख्याही वाढली असून, अनेक निष्पापांनी जीव गमावले आहेत. मात्र स्थानिक विरोध असूनही शासनाकडून दुर्लक्ष केल्यामुळे आता संघर्ष अनिवार्य ठरला आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, पारंपरिक ग्रामसभा आणि जनआंदोलनातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीस खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अतुल गण्यारपवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हा प्रमुख सुरेंद्र चंदेल, भाग्यश्री आत्राम, वासुदेव सेडमाके, अरविंद कात्रटवार यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, ग्रामसभा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ.डाॅ. महेश कोपूलवार, जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, ॲड. जगदिश मेश्राम, काॅ. सचिन मोतकुरवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, काॅ. डाॅ. धर्मराज सोरदे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, शामसुंदर उराडे, रमेश चौखुंडे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, रुषी सहारे समाजवादी पक्षाचे इलियास खान यांनी केले आहे.
या बैठकीतून बळजबरी विकासाच्या विरोधात निर्णायक जनआंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #SaveFarmLand #NoForcefulLandAcquisition #StopDestructiveProjects #PeopleVsProjects #EnvironmentalJustice #भूसंपादनविरोध #लोहखाणीविरोध #भूमिपुत्रांचा_एल्गार #विनाशकारी_विकास #आरमोरीबैठक #गडचिरोलीजनआंदोलन #शेतकरीहक्क #ग्रामसभेचा_संघर्ष #सर्वपक्षीयएकजूट #जनआक्रोश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here