गडचिरोलीच्या हिरवळीवर कुऱ्हाड : सूरजागड खाणीसाठी एक लाख झाडांची कत्तल…

2017

– केंद्राची धोकादायक मंजुरी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : नक्षलग्रस्त आणि जैवविविधतेने नटलेला गडचिरोली जिल्हा पुन्हा एकदा विकासाच्या नावावर उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. सूरजागड लोहखनिज खाणीची उत्खनन क्षमता २.५ पट वाढवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, त्यासाठी तब्बल ९०० हेक्टर जंगल साफ करत एक लाख झाडांची कत्तल केली जाणार आहे. हा निर्णय म्हणजे गडचिरोलीच्या पर्यावरणावर आणि आदिवासींच्या अस्तित्वावर थेट घाव आहे, असा संतप्त सूर आता उमटू लागला आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या खासगी कंपनीला दिलेल्या परवानगीमुळे खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता १० दशलक्ष टनांवरून थेट २६ दशलक्ष टनांवर नेण्यात येणार आहे. यासाठीची जनसुनावणी, मूल्यांकन आणि परवानगी प्रक्रिया केवळ काही आठवड्यांत आटोपली गेली. इतक्या झपाट्याने मंजुरी मिळण्यामागे राजकीय दबाव व औद्योगिक साठेबाजांचे हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
हे जंगल केवळ हिरवे आच्छादन नाही, तर छत्तीसगडपर्यंत पसरलेल्या वन्यजीवांच्या अधिवासाचा कणा आहे. या भागात रस्ते, शेती किंवा मानवी वस्ती नसल्याने वाघ, अस्वल, हरिण, आणि विविध दुर्मिळ पक्ष्यांचे नैसर्गिक वास्तव्य आहे. यामुळे, वन्यजीव संरक्षणाची हमी देत मंजुरी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात जंगलाचा एकघट्टी विनाश अटळ मानला जात आहे.
दरम्यान, या खाण प्रकल्पाविरोधात आधीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका प्रलंबित असताना केंद्र सरकारकडून ही ‘हातउसने’ मंजुरी दिली गेली. न्यायालयीन सुनावणीची प्रतीक्षा न करता दिलेल्या मंजुरीमुळे लोकशाही प्रक्रिया व पर्यावरण न्यायालयीन धोरणांवर मोठा सवाल निर्माण झाला आहे.
२००७ साली भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या खाणीचे उत्खनन २०१६ मध्ये सुरू झाले, मात्र नक्षलवादी हल्ल्यांमुळे काही काळ थांबावे लागले. सध्याही स्थानिक आदिवासी समाज खाण प्रकल्पाला तीव्र विरोध करत असून, वनहक्क कायद्यांतर्गत त्यांच्या हक्कांची पूर्तता न होता दिलेली ही मंजुरी बेकायदेशीर व अमानुष असल्याचे मत आदिवासी संघटनांकडून मांडले जात आहे.
हा प्रकल्प म्हणजे पर्यावरणीय संहार, आदिवासींच्या हक्कांवर अतिक्रमण आणि जंगलाच्या आत्म्याचा गळा दाबणारी योजना असल्याची जोरदार टीका आता उफाळून आली आहे. गडचिरोलीच्या जंगलातून जिथं स्फुरतो आदिम संस्कृतीचा श्वास, तिथंच आता उसळणार आहे धुरांचे भस्म आणि लाल लोखंडाच्या हव्यासाने पेटलेली विकासाची आंधळी आग.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #surjagad)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here