– पीएम-जनमन व धरती-आबा योजनेच्या आढावा बैठकीत प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : पंतप्रधान जनजातीय महासन्मान अभियान (पीएम-जनमन) अंतर्गत मंजूर घरकुले तसेच आदिवासी वस्ती जोडणाऱ्या रस्त्यांची कामे येत्या दोन आठवड्यांत पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.
पीएम-जनमन व धरती-आबा योजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेतला. बैठकीस एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, अ.मु.का.अधिका. राजेंद्र भुयार तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात ७००१ घरकुलांसाठी अर्ज झाले असून, यापैकी ६८७४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यातील १०२४ घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित कामांना गती देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतर्गत मंजूर १० रस्त्यांपैकी अनेक रस्त्यांची कामे वनविभागाच्या परवानग्याअभावी रखडली आहेत. याबाबत तातडीने मुख्य वनसंरक्षकांना सूचित करून दोन दिवसांत अंतिम परवानगी मिळवून कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
मोबाईल मेडिकल युनिट्सच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचत आहेत का, याची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
धरती-आबा योजनेअंतर्गत ४११ गावांमध्ये वैयक्तिक लाभ योजना, आरोग्य तपासण्या, सौर ऊर्जेच्या सुविधा, वनधन केंद्रे आणि कृषी उपक्रम राबवले जात असून त्यातही गती आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी कॅम्पद्वारे कामे गतिमान करावीत असे निर्देश देण्यात आले.
