– आमदार मसराम यांच्या मध्यस्थीचे फळ
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २० : शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेले काँग्रेसचे बेमुदत उपोषण अखेर यशस्वी ठरले. आज दुपारी १२ वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री १०.३० वाजता प्रादेशिक व्यवस्थापक एस. एस. सांबरे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. आमदार रामदास मसराम यांच्या प्रभावी मध्यस्थीमुळे प्रशासनाकडून तात्काळ निर्णय घेण्यात आला.
शासकीय रब्बी धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. केंद्र उघडण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडून कमी दरात धान विकावा लागत होता.सुरुवातीला तहसीलदार रमेश कूंभरे व महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सावळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली, परंतु ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले.
संध्याकाळी ६ वाजता आमदार मसराम यांनी आंदोलनस्थळी धाव घेत, नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाचे जनरल मॅनेजर किरण गाडे व मंत्रालयातील जी. एम. राजश्री सारंग यांच्याशी थेट संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता स्पष्ट केली.
याच अनुषंगाने प्रादेशिक व्यवस्थापक एस. एस. सांबरे यांना तात्काळ कूरखेडा येथे बोलावण्यात आले. रात्री ९.३० वाजता त्यांनी आंदोलकांशी चर्चा करत पलसगड व गोठणगाव या दोन शासकीय धान खरेदी केंद्रे मंगळवारपासून सुरू करण्याची घोषणा केली. तसेच इतर केंद्रेही लवकरच सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शेवटी, सांबरे यांच्या हस्ते आंदोलकांना निम्बू सरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
या आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सभापती गिरीधर तितराम, माजी पं.स. सदस्य धर्मदास ऊईके, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रांजल धाबेकर, सभापती आशिष काळे, नगरसेवक जयेन्द्रसिंह चंदेल, माजी नगरसेवक उस्मान खान यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
