– यू-टर्नचा घातक निर्णय
The गडविश्व
चामोर्शी, दि. १९ : चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर रविवारी दुपारी झालेल्या हृदयद्रावक अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका चुकीच्या यू-टर्नचा घेतलेला निर्णय चार कुटुंबांवर काळ बनून कोसळला.
मृतांमध्ये विनोद पुंजाराम काटवे (४५), राजू सदाशिव नैताम (४५), सुनील वैरागडे (५५) आणि अनिल मारोती सातपुते (५०, रा. चामोर्शी) यांचा समावेश आहे. अपघातात गंभीर जखमी झालेले अनिल सातपुते यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
ही चौघे कामानिमित्त कारने आष्टीकडे निघाले होते. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर चालकाने अचानक यू-टर्न घेतला. त्याच वेळी मागून भरधाव वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडकेचा परिणाम इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि चौघांचा मृत्यू झाला.
हा अपघात केवळ चालकाच्या चुकीचा परिणाम नसून, महामार्गावरील चुकीची रचना, अपुरी सूचना, वाहतूक नियंत्रणाची कमतरता आणि प्रशासनाची उदासीनता यांचाही गंभीर परिपाक मानला जात आहे.
या अपघाताची चौकशी चामोर्शी पोलीस करत असून, मालवाहू ट्रकचा चालक ताब्यात आहे की फरार, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
या घटनेने ‘यू-टर्न’सारख्या छोट्या निर्णयाचाही किती भयावह परिणाम होऊ शकतो, याची जाणीव समाजाला पुन्हा एकदा करून दिली आहे. तसेच महामार्ग सुरक्षेचे पोकळ दावे आणि यंत्रणांची असंवेदनशीलता यावरही कठोर प्रश्न उभे केले आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #chamorshi)