The गडविश्व
पुणे, दि. १५ : “इयत्ता 10वीत 90% पेक्षा जास्त गुण मिळवा आणि मिळवा 2 लाखांचे अनुदान!” – अशा आशयाची माहिती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तथापि, ही योजना सध्या सुरु नसून नागरिकांनी अशा खोट्या माहितीला बळी पडू नये, असा स्पष्ट इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी दिला आहे.
या योजनेचे मूळ नाव ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना’ असून, ही योजना अनुसूचित जातीतील अत्यंत गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 2021 साली जाहीर करण्यात आली होती. त्या वेळी बार्टीमार्फत 10 वीमध्ये 90% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रु. 2,00,000/- चे विशेष आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याने सद्यस्थितीत ती योजना राबविली जात नाही.
अलीकडेच व्हॉट्सअॅप, फेसबुक, टेलिग्राम यांसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर ही योजना सुरु असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. परिणामी, अनेक पालक व विद्यार्थी बार्टीकडे फोन, ई-मेल व प्रत्यक्ष भेटीमार्फत विचारणा करत आहेत.
या पार्श्वभूमीवर बार्टीने अधिकृत स्पष्टीकरण देताना सांगितले की “सदर योजना बार्टीमार्फत सध्या राबवली जात नाही. नागरिकांनी चुकीच्या, भ्रामक माहितीवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी बार्टीच्या संकेतस्थळावर किंवा अधिकृत अधिसूचनांकडे लक्ष द्यावे.”
योजनेबाबत अधिकृत माहिती पाहण्यासाठी बार्टीचे संकेतस्थळ www.barti.maharashtra.gov.in नियमितपणे तपासावे.
शासनाच्या किंवा अधिकृत संस्थांच्या नावाने सोशल मीडियावर पसरवली जाणारी माहिती सत्य आहे की नाही, हे खात्रीशीर तपासल्याशिवाय कृपया शेअर करू नये. अशा अफवांमुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि वेळ व संसाधनांचा अपव्यय होतो.
