– निसर्गप्रेमींना अनोखा अनुभव
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गडचिरोली वनविभागाच्यावतीने ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमांतर्गत १२ मे २०२५ रोजी गुरुवडा नेचर सफारी येथे भव्य प्राणीगणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून व वनसंरक्षक (प्रा.) रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवडा परिसरातील जंगलात प्राणी निरीक्षणासाठी एकूण १० मचाणांची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येकी ३-४ व्यक्ती क्षमतेच्या या लाकडी व लोखंडी मचानांवर बसून निसर्गप्रेमी प्रत्यक्षदर्शी निरीक्षण व ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने प्राण्यांचे दर्शन घेऊ शकतील.
रात्रीच्या थरारक वातावरणात वाघ, बिबट, अस्वल, तडस, कोल्हा, चितळ, भेकर, चौशिंगा, नीलगाय, रानडुक्कर यासह विविध पक्ष्यांचेही निरीक्षण करण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी, वन्यजीव अभ्यासकांसाठी आणि निसर्गप्रेमींना हा अनुभव संस्मरणीय ठरणार आहे.
उपक्रमासाठी प्रति व्यक्ती शुल्क ₹१००० असून, भोजनाची व्यवस्था सहभागी पर्यटकांनी स्वतः करायची आहे. मांसाहार, मसालेदार अथवा उग्र सुगंधी अन्नसाहित्य आणण्यास सक्त मनाई आहे. पाणवठ्यांची स्वच्छता, दुरुस्ती व पाण्याची व्यवस्था तसेच मचाण उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत.
या उपक्रमाचे नेतृत्व अरविंद पेंदाम (वनपरिक्षेत्राधिकारी, गडचिरोली) करत असून, गुरुवळा व हिरापूर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, क्षेत्र सहायक विजय जनबंधू, वनपाल, वनरक्षक, वनमजूर व सफारी गाईड कार्यक्रमाच्या यशासाठी अथक प्रयत्न करत आहेत.

नोंदणीसाठी संपर्क :
अतुल – 8275840208, लंकेश – 8308536649
निसर्गाच्या सान्निध्यात जंगलातील जीवनाचा ‘थेट अनुभव’ घेण्यासाठी ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नका!