– गुणवत्तेची परंपरा कायम
The गडविश्व
ता.प्र / चिमूर – नेरी, दि. ०८ : शिक्षण म्हणजे केवळ गुणपत्रिका नव्हे, तर भविष्य घडवण्याची दिशा असते, आणि ही दिशा योग्य असल्यास ग्रामीण भागातही यशाची शिखरं सर करता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे चिमूर तालुक्यातील नेरी येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी. लोक कल्याण शिक्षण मंडळ, नेरी संचलित या महाविद्यालयाचा इ.१२ वी (HSC) परीक्षेतील निकाल यंदा 76.92% इतका लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा झेंडा उंचावला आहे.
या निकालात सानिका निकुरे हिने 81.83% गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ शरद बारसागडे (80.67%) आणि पायल गायकवाड (80%) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. तसेच महेश जीवतोडे (78.33%), हर्षाली पारसे (75.67%) आणि तृप्ती डाहारे (74.50%) यांची कामगिरीही विशेष उल्लेखनीय ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवित यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा आधार हे मुख्य आधारस्तंभ ठरले आहेत.
राज्याच्या सरासरी निकालाच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ग्रामीण शिक्षणासाठी आश्वासक मानला जात आहे. महाविद्यालयात वर्षभर घेतलेले विशेष वर्ग, चाचण्या, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि शैक्षणिक उपक्रम यांचे फलित म्हणजे हा निकाल आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजांशी सुसंगत राहून विद्यार्थी घडविण्याचे कार्य महाविद्यालय सातत्याने करत आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, संचालक मंडळ आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मेहनतीने, जिद्दीने आणि योग्य दिशेने वाटचाल केल्यास यश दत्त म्हणून लाभते, हे जनता कनिष्ठ महाविद्यालय, नेरीने यंदाही सिद्ध करून दाखवले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chimurnews #hscresult #sscresult #nerichimur #neri #jantavidyalay #chandrpur)