The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान व मका पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा, फराडा परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.
पिकांची अवस्था पाहून व्यथित झालेल्या खासदार किरसान यांनी, “शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवणार असून, नुकसानभरपाई तातडीने मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन दिले.
वैनगंगा नदी काठच्या परिसरात शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सोयीचा लाभ घेत उन्हाळी धान व मका लागवड केली होती. मात्र, सततच्या वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे कापणीपूर्वीच मोठे नुकसान झाले. बँक कर्जावर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे.
या पाहणीवेळी जि.प. माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, तसेच सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
डॉ. किरसान यांच्या या तत्पर दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे, आणि शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
