The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला व पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला आहे. रोजगारनिर्मिती व शाश्वत उत्पन्नाच्या दिशेने मोठे पाऊल म्हणून या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील अनेकांसाठी संधींचे दार खुले करणारा ठरणार आहे.
या योजनांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन यांसारख्या उपक्रमांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यात दुधाळ गाई/म्हशी वाटप, 1000 मांसल कुक्कुट संगोपनासाठी निवारा शेड उभारणी, 100 कुक्कुट पिलांचे वाटप, तसेच 25+3 तलंगा गट वाटप अशा योजना समाविष्ट आहेत.
विशेष बाब म्हणजे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांची नावे 5 वर्षांसाठी प्रतिक्षा यादीत समाविष्ट केली जाणार असून, लाभ मिळण्याच्या संभाव्य तारखेची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. त्यामुळे अर्जदारांना योजनांच्या तयारीसाठी योग्य नियोजन करता येणार आहे.

ऑनलाईन अर्जासाठी महत्त्वाची माहिती:
अर्ज करण्याचा कालावधी : 2 मे 2025 ते 1 जून 2025
संकेतस्थळ : https://ah.mahabms.com
मोबाईल ॲप : AH-MAHABMS (Google Play Store वर उपलब्ध)
टोल फ्री क्रमांक : 1962 (सोमवार ते शनिवार, सकाळी 7 ते संध्याकाळी 6)
अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ असून, मोबाईलवरूनही सहज अर्ज करता येईल. यामध्ये कमीत कमी माहिती टाईप करावी लागते आणि बहुतेक पर्याय निवड स्वरूपात दिले आहेत. अर्ज भरताना नोंदवलेला मोबाईल क्रमांक कायम ठेवावा, कारण अर्जाच्या स्थितीची माहिती त्यावरच पाठवली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय अथवा जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विलास गाडगे (जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली) यांनी केले आहे.
उद्योजकतेचा मार्ग खुला करणाऱ्या या योजनांचा लाभ घेऊन ग्रामीण युवकांनी आत्मनिर्भरतेकडे पहिले पाऊल उचलावे!
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #ipl2025 )