The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०६ : गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा पाऊल उचलले आहे. धानोरा तालुक्यातील १७ अंगणवाड्यांचे ‘स्मार्ट अंगणवाडी’ केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले असून, याचा थेट लाभ शून्य ते सहा वयोगटातील ४४३ बालकांना होणार आहे.
बालकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, त्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास साधावा, यासाठी अंगणवाड्यांचे डिजिटल रूपांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकात्मिक बालविकास सेवा योजना, आयुक्तालय मुंबईमार्फत ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ चा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये सौरऊर्जा संच, स्मार्ट टीव्ही, ई-लर्निंग साहित्य, शैक्षणिक खेलणी, रंगीत भिंतीवरील चित्ररचना, स्वच्छतेसाठी साबण आदी साहित्याचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यांत सहा तालुक्यांतील १५० अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यात आले. मागील सहा वर्षांत जिल्ह्यातील २२०० पैकी ६९२ अंगणवाड्या स्मार्ट करण्यात आल्या आहेत.
धानोरा तालुक्यातील पाच बिटांमधील अंगणवाड्यांचा यात समावेश असून, त्यामध्ये खालील अंगणवाड्यांचा समावेश आहे.

धानोरा बिट : मुंज्यालगोंदी (दराची – २७ बालक), सालेभटी (पवनी – ३९), चिंचोली (जेवलवाही – २०)
मुरुमगाव बिट : बोधनखेडा (३९), गजामेडी (५६), हिंरगे (४१), मरारटोला (१८)
पेंढरी बिट : चिचोंडा (२३), कामतळा (१४), मंगेवाडा (२७), मासानदी (३०)
रांगी बिट : चिंगली-१ (३८), चिंगली-२ (१६), मोहलिटोला (११)
सुरसुंडी बिट : बोगाटोला (१४), सुरसुंडी (२३), कोल्हारबोडी (१५)
या स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये एलईडी टीव्हीवरून गाणी, गोष्टी व शिक्षणात्मक कार्यक्रम दाखवले जात असून, बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे मनोरंजनाच्या माध्यमातून दिले जात आहेत. महावितरण व सौरऊर्जेच्या साहाय्याने सतत वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे दुर्गम भागातील बालकांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.