The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : “जगभरात भांडवलशाहीने कमाल गाठलेली असताना श्रमिक, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन अधिकच दारिद्र्यग्रस्त झाले आहे. या परिस्थितीत केवळ मार्क्सवादच गरिबांचे दुःख आणि दारिद्र्य दूर करू शकतो,” असे स्पष्ट प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित काॅम्रेड कार्ल मार्क्स यांच्या २०७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. सचिन मोतकुरवार, काॅ. सचिन जक्कुलवार, आझाद समाज पक्षाचे नागसेन खोब्रागडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“गर्दी जमवून हिंसाचार घडवणे कधीच मार्क्सवाद नव्हता. मार्क्स यांनी जगाला दिलेले तत्वज्ञान म्हणजे अभ्यासपूर्ण वर्ग संघर्ष, श्रमाला प्रतिष्ठा आणि सर्वांसाठी सामाजिक समानता मिळवण्याचा शास्त्रोक्त मार्ग,” असे मत रामदास जराते यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात “मार्क्स कोण होता?” या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर सर्व कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीचे भोजनदानही करण्यात आले.
यावेळी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काॅ. सचिन मोतकुरवार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते, डंबाजी भोयर, रामदास आलाम, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, चिरंजिव पेंदाम, अभिलाषा मंडोगडे, छाया भोयर, रजनी खैरे, योगाजी चापले, मुरलीधर गोटा, धारा बन्सोड, नूतन वेळदा, ऊषा बावणे, संदेशा दरडे, शिल्पा लटारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
