The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०४ : गडचिरोली जिल्ह्यातील जैवविविधतेने समृद्ध, पण मानव-वन्यजीव संघर्षाने सतावलेल्या उत्तर धानोरा परिसरात शांतता आणि सहअस्तित्व साधण्यासाठी झटणाऱ्या वनपाल संजय रामगुंडेवार यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. ‘मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन’ या अत्यंत संवेदनशील विषयात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची अधिकृत दखल घेतली गेली आहे.
रांगी उपक्षेत्र परिक्षेत्र, उत्तर धानोरा येथे कार्यरत असलेल्या गुंडेवार यांनी वन्य प्राण्यांचे अधिवास जपत, त्यांच्या हालचालींचे निरीक्षण करून धोरणात्मक निर्णय घेतले. स्थानिक ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांनी संघर्ष टाळण्याचे प्रयत्न यशस्वीपणे राबवले.
त्यांच्या या कार्याचा गौरव मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली आणि उपवनसंरक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी देण्यात आलेल्या सन्मानपत्रात नमूद करण्यात आले आहे की – “संजय रामगुंडेवार यांनी मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनाच्या कामात अत्युत्कृष्ट कामगिरी बजावली असून, त्यांच्या कार्याने वनसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.”
गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात वन्यजीव संरक्षण, ग्रामस्थांचा सहभाग आणि संघर्षमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी त्यांच्या संवेदनशील आणि संयमी दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांच्या कार्यामुळे ‘वनसंवर्धन म्हणजे संघर्ष नव्हे, सहअस्तित्व’ हा संदेश ठळकपणे पुढे आला आहे.
