जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे शेतकरी कामगार पक्षाकडून स्वागत

39

The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : संघ राज्य सरकारने देशपातळीवर जातनिहाय जनगणना करावी, ही भारतीय शेतकरी कामगार पक्षाची गेल्या अनेक वर्षापासूनची आग्रही मागणी होती. संघराज्य सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा शेतकरी कामगार पक्ष स्वागत करत असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आदिवासी,भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते यांनी म्हटले आहे.
शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पंढरपूर येथे पार पडलेल्या १९ व्या अधिवेशनातही जातनिहाय जनगणना करण्यात यावी, असा ठराव संमत करण्यात आला होता. जातनिहाय जनगणना करण्यात आल्यानंतर देशातील १८ पगड बहुजन जातींची नेमकी संख्या व त्यांची सामाजिक शैक्षणिक स्थिती याचे चित्र स्पष्ट होईल व त्यानुसार या समाजाच्या विकासासाठी निश्चित धोरण, योजना आणि अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येऊ शकते अशी शेतकरी कामगार पक्षाची भूमिका राहिली आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि देशातील सर्व समविचारी पक्ष आणि संघटना ज्या ज्या लोकांनी या मागणीचा आग्रह धरला आणि प्रसंगी त्याकरीता आंदोलनात्मक कृती केल्या अशा सर्वांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे, अशी शेतकरी कामगार पक्षाची भावना आहे.
जातनिहाय जनगणनेनंतर त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल संघराज्य सरकारने सर्व जनतेकरिता खुला करावा व आगामी काळात कष्टकरी बहुजन समाजातील लोकांचे जीवनमान उन्नत व विकसित करण्याकरिता योजना राबवाव्यात व या योजनांकरिता भरीव आर्थिक तरतूद करावी अशी मागणीही पक्षाच्या वतीने रामदास जराते, शामसुंदर उराडे, जयश्रीताई जराते, डाॅ. गुरूदास सेमस्कर, रमेश चौखुंडे, चंद्रकांत भोयर, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पवित्र दास, बाधित शेतकरी आघाडीचे प्रभाकर गव्हारे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, भटके – विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, महिला जिल्हाध्यक्ष कविता ठाकरे, पोर्णिमा खेवले, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षा अभिलाषा मंडोगडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here