गडचिरोली : हायवा ट्रकने चिरडले, अपघातात एक जण ठार

1331

The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : शहरातील चंद्रपूर मार्गावरील जिल्हा सत्र न्यायालय चौकात मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास शंकर वासनिक (वय ५७, रा. मुरखळा) यांचा मृत्यू झाला. MH-34 M-8970 क्रमांकाच्या हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यात त्यांच्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.
अपघातानंतर वासनिक यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात हेलिकॉप्टरद्वारे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुपारच्याच सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे पोलिस विभागात आणि शहरात शोककळा पसरली आहे. प्रभारी पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तात्काळ मदत कार्याची जबाबदारी सांभाळून माणुसकीचे उदाहरण ठेवले होते, मात्र सर्व प्रयत्नांनंतरही वासनिक यांचा जीव वाचवता आला नाही.
दरम्यान, अपघात घडलेला सत्र न्यायालय चौक हा शहरातील सर्वाधिक धोकादायक चौकांपैकी एक असून, येथे वाहतूक व्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे. ना सिग्नल, ना गतिरोधक, ना वाहतूक पोलिस – परिणामी अशा अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. “घटना घडल्यानंतरच प्रशासन हलते, पण वेळीच उपाययोजना का केली जात नाही?” असा थेट सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्त ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #accident )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here