– भाडेकरू आरोपीला गडचिरोली पोलिसांकडून अटक
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : नवेगाव येथे निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे (वय ६४) यांच्या निर्घृण खुनाचा अवघ्या काही दिवसांत गडचिरोली पोलिसांनी छडा लावत भाडेकरू विशाल ईश्वर वाळके (वय ४०) याला अटक केली आहे.
१३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ ते २.३० च्या दरम्यान कल्पना विहार, सुयोगनगर येथील राहत्या घरी उंदिरवाडे यांच्या डोक्यावर प्राणघातक वार करण्यात आला होता. या गंभीर हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर अज्ञात आरोपीविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुनानंतर आरोपीने कोणताही ठोस पुरावा मागे न सोडल्याने गडचिरोली पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष तपास पथक तयार करून तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित विशाल वाळकेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
आरोपी वाळके हा मयत महिला अधिकाऱ्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. त्याच्यावर असलेल्या कर्जामुळे व उसनवारीच्या पैशांमुळे चोरीच्या उद्देशाने त्याने खून केला. हल्ल्यानंतर मृत महिलेच्या अंगावरील दागिने घेऊन तो पसार झाला होता असे तपासात उघड झाले.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपीस अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले असून, त्याला प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता २२ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरज जगताप करीत आहेत.
ही कारवाई पोनि. रेवचंद सिंगनजूडे, पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, राहूल आव्हाड, विजय चव्हाण, दिपक चव्हाण, विशाखा म्हेत्रे व त्यांच्या पथकांनी पार पाडली. गडचिरोली पोलिसांच्या तत्परतेमुळे अत्यंत गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #breakingnews )