The गडविश्व
धानोरा, दि. ०३ : तालुक्यातील सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा येरकड येथे १५ हेक्टर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम उत्साहात सुरू करण्यात आला आहे. या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन शाखा अभियंता, रोहयो विभाग, गडचिरोली कुंभारे व श्याम गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये आर. एच. ढवळे (रोहयो विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली), किरण गजलवार मॅडम (APO), निशा (डाटा एन्ट्री ऑपरेटर), भानारकर (TPO धानोरा), कुणाल गुरणूले (सृष्टी संस्था, येरंडी), गजानन काटेंगे (अध्यक्ष, ग्रामसभा येरकड), सतीश जनबंधू (मेट), मनोज चव्हाण (मास्टर ट्रेनर), धनंजय ठाकरे (समन्वयक), सायली मेश्राम (कार्यकर्ती, सृष्टी संस्था येरंडी) आणि डंकलवार (RO, दक्षिण धानोरा) यांचा समावेश होता.
उद्घाटन प्रसंगी शाखा अभियंता कुंभारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, ग्रामसभा येरकड येथील स्थानिक ग्रामस्थांसाठी सामूहिक वन हक्क (CFR) अंतर्गत बांबू लागवडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व पर्यावरणीय समृद्धी साधणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पातून २६,२३५ मनुष्य दिवस निर्माण होणार असून, यामुळे गावातील गरीब व बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.
कुणाल गुरणूले यांनी आपल्या प्रस्ताविकेत सांगितले की, मागील तीन वर्षांपासून सृष्टी संस्था, येरंडी धानोरा तालुक्यातील १० ग्रामसभांसोबत वन हक्क कायदा आणि ३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (NAREGA) माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. वनावर अवलंबून असलेल्या आदिवासी व पारंपरिक समुदायांची उपजीविका सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था कार्यरत आहे. जल, जमीन व जंगलाच्या संवर्धनासाठी स्थानिक गावकऱ्यांना वन व्यवस्थापन, लागवड व संवर्धनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना NAREGA प्रकल्पाचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
श्याम गेडाम यांनी रोजगार हमी यंत्रणा ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची क्षमता असलेली योजना असल्याचे सांगितले. सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा जर योग्य नियोजन करून कामे हाती घेतली, तर गावातील नागरिकांना बारमाही रोजगार मिळू शकतो. यामुळे गरीब, गरजू शेतमजुरांची आर्थिक प्रगती होईल. यावेळी त्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी रोहयो मजुरी दर ३१२ रुपये असल्याची माहिती दिली.
डंकलवार (RO) यांनी ग्रामसभा आणि वन विभाग यांच्या समन्वयातून कार्य केल्यास पुढील चांगली कामे होतील आणि वन विभागातील कर्मचारी व अधिकारी ग्रामसभा आणि यंत्रणेच्या पाठीशी सदैव राहतील, असे सांगितले. ग्रामसभांनी तांत्रिक मदत लागल्यास समन्वय साधून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सामूहिक वन हक्क क्षेत्रात बांबू लागवड हा महत्त्वाचा उपक्रम असून, याच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, जमिनीचे संवर्धन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक बेरोजगारी कमी होईल तसेच वनसंवर्धनालाही गती मिळेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला आणि प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी पाठिंबा दर्शविला.
मनोज चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व संस्था कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, अधिकारी आणि ग्रामसभेतील महिला व पुरुष यांचे आभार मानले.
हा उपक्रम रोहयो विभाग आणि स्थानिक समुदायाच्या सहभागाने पर्यावरण व रोजगाराच्या क्षेत्रात एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.
