खरकाडा येथे अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल

220

– गावकऱ्यांचा कठोर निर्धार
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २४ : खरकाडा गावात अवैध दारूविक्री रोखण्यासाठी गावसभेत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना दारूबंदी समिती आणि ग्रामस्थांनी कठोर पाऊल उचलले आहे. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे परवेझ करीम शेख या व्यक्तीच्या घराच्या मागे शेतात लपवून ठेवलेली दारू जप्त करण्यात आली. यानंतर कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला.
गावसभेत सर्वानुमते दारूबंदीचा निर्णय घेतला असून, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गावात अवैध दारूविक्री करणाऱ्यांना ५० हजारांचा दंड, शासकीय कागदपत्रे आणि रेशन बंद करण्यासह कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष दारूबंदी समिती कार्यरत आहे.
या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, गावकऱ्यांनी एकजुटीने हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी मुक्तीपथ तालुका टीम उपस्थित होती.

#खरकाडा #दारूबंदी #गावसभाचानिर्णय #अवैधदारूविक्री #कुरखेडा #ग्रामस्थसतर्क #मुक्तीपथ #स्थानिकवृत्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here