The गडविश्व
कुरखेडा/ गडचिरोली, दि. २२ : कुरखेडा तालुक्यातील खरकाडा येथे आयोजित गावसभेत अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. आता या गावात दारूविक्री करताना आढळून आल्यास तब्बल ५० हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे तसेच विक्रेत्यांची माहिती देणाऱ्या बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे. गावाने घेतलेल्या या निर्णयामुळे निश्चितच गाव दारूमुक्त होण्याची शक्यता आहे.
खरकाडा गावामध्ये अवैध दारूविक्रीची समस्या लक्षात घेता गावातील दारूविक्री बंद झाली पाहिजे याकरिता महिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी मुक्तीपथ तालुका चमूने गावाला वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले. अवैध दारूविक्रीच्या मुद्द्याला घेऊन गाव सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. गावात जो कोणी दारूविक्री करताना आढळून आल्यास संबंधितांकडून ५० हजारांचा दंड, ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणारे शासकीय दाखले, कागदपत्रे, राशन बंद करण्याचे ठरविण्यात आले. विक्रेत्यांना नोटीस व हमीपत्र लिहून घेत दारूबंदीची सूचना देण्यात आली. दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना व पुरुषांना अपशब्द व शिवीगाळ केल्यास पोलिस तक्रार करून पोलिसांच्या स्वाधीन करता येईल असेही सांगण्यात आले. गावातील दारू पकडुन दिल्यास त्याला बक्षीस देण्याचे निर्णय घेतला. तसेच गावातील दारूविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दारूबंदी समिती नेमण्यात आली.
यावेळी पोलिस पाटील महादेव बनसोड, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन मडावी, उपसरपंच अक्षपाल मडावी, देविदास गेडाम, संगम कराडे, चेतन गेडाम, जिजाबाई मडावी,सीताबाई मडावी,विश्रांती कराडे , मायाबाई मडावी , कौसाबाई कुमरे, माया राऊत, सुनंदा बोगा,समस्थ ग्रामवासी,व समस्थ महिला उपस्थित होत्या. मुक्तीपथ तर्फे तालुका संघटक सौ शारदा मेश्राम,जीवन दहिकर व महेश खोब्रागडे उपस्थित होते.
