महसूल सेवक (कोतवाल) यांची वेतनश्रेणीची मागणी प्रलंबित; सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

309

The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १९ : महाराष्ट्रातील महसूल सेवक (कोतवाल) गेल्या 40-50 वर्षांपासून चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणीच्या मागणीसाठी लढा देत आहेत, मात्र अद्याप तीन सरकारे आली तरीही ही मागणी मान्य झालेली नाही. याउलट, शासनाने केवळ 10% मानधनवाढ जाहीर केली असून तीही 2026 पासून लागू होणार आहे, त्यामुळे महसूल सेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य सरकारने 19 मार्च 2025 पर्यंत मागण्या मान्य न केल्यास, 20 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल सेवक (कोतवाल) आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत कामबंद आंदोलन आणि धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे.
आज कूरखेडा तालुका महसूल सेवक संघटनेची सभा रवींद्र बोदेले तालुका अध्यक्ष तथा विदर्भ अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली आज कुरखेडा येथे पार पडली. यावेळी सभेला सर्व महसूल सेवक उपस्थित होते. दरम्यान मुंबई येथे बेमुदत कामबंद आंदोलनाकारिता जाण्याचे यावेळी ठरले. तसेच या बेमुदत काळात कोणीही साझा / तहसील मध्ये जाणार नाही अन्यथा ५०० रूपे दंड आणि संघटनेचे सदस्यत्व रद्द करण्याचे एक मताने ठराव पारित करण्यात आला. या बेमुदत कालावधीत रात्रीपाळीतील ड्यूटी, चेक पोस्ट ड्युटी, राजस्व कॅम्प तथा सर्व महसुली व इतर कामे कडेकोट बंद करण्याचे एक मताने ठराव घेऊन मंजूर करण्यात आला. तसेच याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने तहसीलदार कुरखेडा यांच्या मार्फतिने मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
महसूल सेवक संघटनेने मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे की, इंग्रज काळापासून सुरू असलेली वेतन श्रेणीची मागणी मंजूर करून अन्याय दूर करावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन होईल. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या मागण्यांचा विचार करण्यात आलेला नाही, यामुळे महसूल सेवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here