The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा शहरात अवैध सुरु असलेली दारू व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी मुक्तिपथ शहर संघटना व वार्ड संघटना सदस्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी यांना प्रतिनिधी सदस्यांद्वारे सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा शहरात काही ठिकाणी राजरोसपणे दारूविक्री सुरु आहे. यामुळे व्यसनी लोकांच्या संख्येत वाढ होत झाली आहे. तरुण व लहान मुलांमध्येही दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबात भांडणे होत असल्यामुळे महिलांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. अवैध दारूविक्री होत असल्यामुळे शाळकरी मुलांना रस्त्याने ये-जा करताना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे.
शहरात पानटपरीवर खुलेआम तंबाखूजन्य पदार्थही मिळत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत व लहान मुलांचे व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. या सर्व अवैध विक्रीमुळे शहरातील जनतेस त्रास होत आहे. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्री व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. सोबतच शहरातील अवैध दारूविक्रेत्यांची यादी पोलिस विभागास सादर करण्यात आली आहे. निवेदनावर शहरातील ९७ नागरिकांची स्वाक्षरी करून निवेदन देण्यात आले आहे.
