धानोरा : विहीर बांधकाम करतांना दरड कोसळली, कामगाराचा मृत्यू

1516

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि.२३ : शेतशिवरात विहीर बांधकाम करतांना दरड कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील पनेमारा येथे शुक्रवारी घडली. वसंत बुधेसिंग फाफामारिया (अंदाजे वय 38) रा. बेलगाव आहे मृतकाचे नाव आहे.
पन्नेमारा येथील लछचन तुलावी यांच्या शेतात महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीचे बांधकाम सुरू आहे. खोदकाम केलेल्या विहिरीत रिंग टाकण्याचे काम सुरू होते. अचानक वरच्या बाजूने मातीची दरड कोसळल्याने मातीमध्ये तिन मजुर सापडले. बांधकाम करीत असलेल्या तीन मजुरांपैकी वसंतच्या कपाळावर काँक्रीटचा मार लागला आणि वरून मातीचा ढिगारा कोसळल्याने तो मांडीपर्यंत विहिरीच्या आत दबल्या गेला. यावेळी त्याच्या बाजूला असलेले दोन मजूर सामू मालिया व संदीप पोयाम यांनी लगेच पावड्याने माती ओढून त्याला बाहेर काढले असता वसंत हा पूर्णता बेशुद्ध अवस्थेत आढळला. विहिरीच्या काठावर असलेल्या मजुराच्या साह्याने त्याला वर काढण्यात आले व तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. राहुल बनसोड यांनी तपासून वसंतला मृत घोषित केले व पोलीस विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी उत्तरीय तपासणी करिता मृतदेह शवविच्छेदनासाठी धानोरा येथे पाठविण्यात आले.
मृतक वसंत फाफामारिया या मजुराच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत असून मृतक मजुराला नुकसान भरपाई कोण आणि कुठून दिली जाणार असा सुद्धा प्रश्न विचारीत आहेत. घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
घटनेनंतर MRGS चे पं. स.अभियंता खराटे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व मृतक मजुराकडे MRGS योजनेचे जॉब कार्ड असून त्याच्या पश्चात पत्नी , दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे, कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सरपंच शिवप्रसाद गवर्णा यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here