– अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली फाट्यावरील बस थांब्यावर काही समाजकंटक देशद्रोह्यांनी संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लिहिलेल्या अवमाजनक व आक्षेपार्ह मजकुराचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला असून सदर कृत्य करणाऱ्या लोकांना त्वरीत पकडून त्यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कडक शिक्षा देण्याची यावी, अशी मागणी केली आहे.
सोमनपल्ली फाट्यावरील बसथाब्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विरूध्द काळ्या शाहीने मोठ्या अक्षरात अत्यंत आक्षेपार्ह व अवमानजनक मजकूर लिहिला असल्याचे सोमनपल्ली व जवळपासच्या नागरिकांच्या शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी लक्षात आले. त्यांनी लगेच या प्रकरणाची पोलिसांना सूचना देवून रास्तारोको आंदोलन सुरू केले. पोलिसांनी मजकूर लिहिलेले टिनाचे पत्रे सध्या जप्त केले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार असून संपूर्ण देशाचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल अशाप्रकारचा घाणेरडा मजकूर लिहिल्याने संपूर्ण आंबेडकरीवासीयांच्या व देशवासीयांच्या भावना दुखावल्या असून हे कृत अत्यंत निंदनीय व देशद्रोहाचे आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सदर मजकूर लिहिणाऱ्या समाजकंटकांना त्वरीत पकडून त्यांचेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, केशरावराव सामृतवार, महिला नेत्या सुरेखा बारसागडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, विधानसभा अध्यक्ष प्रदीप भैसारे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडी अध्यक्षा नीता सहारे, युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे आदींनी केली आहे.
तसेच आरोपींना तत्काळ अटक न केल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
