– गावाच्या विकासाठी उल्लेखनीय निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बिजापूर येथे हरिराम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली गावसभेचे आयोजन करून दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला. गावात दारूविक्री करताना आढळून आल्यास २० हजारांचा दंड व संबंधित व्यक्तीच्या सामाजिक किंवा घरगुती कार्यात सहभागी न होण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला.
बिजापूर २८ कुटुंबाचे छोटे गाव आहे. या गावात सर्वच आदिवासी कुटुंब राहतात. गावात अवैध दारूविक्री सुरु असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाला दारूविक्रीमुक्त करण्याचे ठरविले. दरम्यान, सभेचे आयोजन करून गावाला अवैधदारूविक्रीमुक्त करण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्याअनुषंगाने दारू पिऊन घिंगाना घातल्यास किंवा महिलांसोबत असभ्य वर्तणूक केल्यास त्याच्यावर दंड, गावात दारू काढणाऱ्या व्यक्तीच्या कामावर जाण्यास बंदी. तसेच दारूसंबंधित व्यक्तीकडे कामावर गेल्यास त्याच्यावर सुद्धा पाच हजार रुपये दंड ठेवण्यात आला आहे. दंड न दिल्यास त्याच्यावर ग्रा.पं.च्या वतीने योग्य कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. सट्टापट्टी व जुगारावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. दारू विक्री बाबत माहिती देणाऱ्यास १ हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीला बिजापूरचे पोलिस पाटील कैलास मडावी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप दर्रो, शिवचरण मडावी, सुभाष दुर्वे, कमलाबाई दर्रो , वनिता दर्रो, ध्रुपदा कोवाची, देवानंद मडावी, विनोद गोटा टिकाराम कुंबरे, सखाराम दररो, रामलाल हारामी ,अविनाश पोरेटी, देवानंद मडावी देवनाथ आचला इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. या निर्णयाची अंमलबजावणी करीत गावात व्यसन उपचार शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे खेडेगाव ग्रा.प. मध्ये येणारे बिजापूर, खेडेगाव व गरगडा तिन्ही गावात अवैधदारूविक्री बंद आहेत. बिजापूर हे आदिवासी गाव असूनही व्यसनाचे दुष्परिणाम लक्षात घेता व पुढच्या पिढीचे भविष्य उज्वल करण्यासाठी हा महत्वाचा व उल्लेखनीय निर्णय या गावाने घेतला आहे.

(#thegdv #gadvishva #gadchirolinews #muktipath #bijapur #kurkheda )