आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्य बहिष्कृत : सहा जात पंचाविरुद्ध गुन्हे दाखल

251

The गडविश्व
सांगली : आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्यांना बहिष्कृत करण्यात आले. याप्रकरणी नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचाविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यानी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासासाठी प्रयत्न केले.
इस्लामपूर येथील प्रकाश भोसले (४२) यांनी या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात समाजातील पंचाविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी नंदीवाले समाजाचे पंच विलास भिंगार्डे, चंद्रकांत पवार दोघेही रा. इस्लामपूर, शामराव देशमुख, अशोक भोसले रा. दुधोंडी, किसन इंगवले रा.जुळेवाडी आणि विलास मोकाशी रा. निमणी या सहा पंचाविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा सुमारे १५० दाम्पत्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. बहिष्कृत केलेल्यांना समाजातील सुख-दु:खाच्या प्रसंगी बोलावले जात नाही, त्यांच्याशी संबंध ठेवले जात नाहीत. अशा तीस दाम्पत्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सातारा शाखेशी संपर्क साधून बहिष्कार उठविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. यानुसार अंनिसने काही पंचांशी संपर्क साधून हा प्रकार बेकायदा असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी बहिष्कार मागे घेत असल्याचेही कबूल केले. मात्र, पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे ९ जानेवारी रोजी झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्याने गुन्हा दाखल करावा लागल्याचे पीडित प्रकाश भोसले यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here