मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे ८ गुन्हे उघडकीस : ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ७ : जिल्ह्यातील दुर्गम भागात मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या वाढत्या घटनांवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले असून चारचाकी वाहन आणि रोख रक्कमेसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील चारचाकी वाहन चोरीचा एक गुन्हा उघड झाल्याने एकूण ९ गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे.
मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील १५ दिवस संवेदनशील भागांमध्ये पथकाने गुप्त पाळत ठेवली. यावेळी एका पिकअप वाहनावर संशय निर्माण झाला. सदर वाहनाचे चालक गोविंद खंडेलवार (१९, आलापल्ली) याला शोधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने हे वाहनही चोरीचे असल्याची कबुली देत मोबाईल टॉवर बॅटरी चोरीची माहिती उघड केली.
खंडेलवारने उमेश मनोहर इंगोले (३८, नेहरू नगर, गडचिरोली) व आणखी दोन साथीदारांच्या मदतीने कांदोली, गुरज्या, येमली, ताडगाव, तलवाडा, वेदमपल्ली व राजाराम (खां.) येथील मोबाईल टॉवरवरून बॅटऱ्या चोरल्याचे सांगितले. चोरी केलेल्या बॅटऱ्या त्यांनी तिरुपती व्यंकया दासरी (३८, अहेरी) यास विकल्या. पुढे दासरीने त्या कागजनगर येथील याकुब शेख यास विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या आरोपींकडून २ लाख रुपये रोख रक्कम, पिकअप वाहन किंमत ३ लाख रुपये, तसेच साहित्य मिळून एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात पोस्टे अहेरी येथील २, पेरमिली २, येमली बुर्गी २, ताडगाव १ व राजाराम (खां.) येथील १ असे मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे ८ गुन्हे तसेच गोंडपिपरी, जि. चंद्रपूर येथील वाहन चोरीचा १ गुन्हा उघडकीस आला आहे.
सदर आरोपी सध्या पोमकें येमली बुर्गी येथील गुन्ह्यात अटकेत असून सर्व गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोनि. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. भगतसिंग दुलत, पोउपनि. विकास चव्हाण, मपोउपनि. इंगोले तसेच पोलीस कर्मचारी सतिश कत्तीवार, राजु पंचफुलीवार, शिवप्रसाद करमे, श्रीकांत बोईना, धनंजय चौधरी, दिपक लोणारे, गणेश वाकडोतपवार व सुजाता ठोंबरे यांनी सहभाग नोंदविला.
या कारवाईमुळे दुर्गम भागातील टॉवर सुरक्षा बळकट झाली असून पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.














