गडचिरोली जिल्ह्यात ३५वे पोलीस स्टेशन कार्यान्वित

21

गडचिरोली जिल्ह्यात ३५वे पोलीस स्टेशन कार्यान्वित
– चातगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत धानोरा तालुक्यातील चातगाव येथे नव्या पोलीस स्टेशनचे उद्घाटन आज 14 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या 28 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये चातगाव येथील पोलीस मदत केंद्राला पोलीस स्टेशनचा दर्जा प्राप्त झाला असून, यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशनांची संख्या ३५ वर पोहोचली आहे.
2010 मध्ये उभारलेल्या चातगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस स्टेशनमध्ये रूपांतर झाल्याने परिसरातील 26 गावांना त्वरित व सक्षम पोलीस सेवा मिळणार आहे. माओवादी कारवायांसह वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी हे स्टेशन प्रभावी ठरणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
उद्घाटनानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुरक्षा गार्ड, अधिकारी-अंमलदारांच्या बॅरेक, एसआरपीएफ व्यवस्थेसह पोलीस स्टेशन परिसराची पाहणी केली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “चातगाव पोलीस स्टेशन कार्यान्वित झाल्याने नागरिकांना मदत, तक्रार नोंदणी आणि सुरक्षा सेवा अधिक सुलभपणे मिळतील. सीसीटीएनएस, ई-साक्ष आणि नव्या कायद्यांचा प्रभावी वापर करून अधिकारी-अंमलदारांनी नागरिकांच्या समस्या त्वरित मार्गी लावाव्यात.”
या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, चातगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोउपनि चैतन्य काटकर यांच्यासह अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोस्टे चातगावचे प्रभारी अधिकारी चैतन्य काटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. नव्या पोलीस स्टेशनमुळे चातगाव परिसरातील शांतता, सुरक्षा आणि प्रशासनाचा विश्वास अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here