धानोरा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी 750 अर्ज

671

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १९ : महिला व बाल विकास प्रकल्प, धानोरा अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी निवड यादी ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध झाली आहे. या यादीवरील आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2025 आहे.
धानोरा तालुका अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात येतो. येथे लहान मुलांच्या संगोपनासाठी एकूण 289 अंगणवाड्या कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तालुक्यात 120 रिक्त पदांसाठी 750 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असून, उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांकनाच्या आधारे होणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षण घेतलेले अनेक उमेदवारही आहेत.
आजच्या काळात उमेदवार नोकरीच्या शोधात असून, मिळालेली संधी स्वीकारण्यास तयार आहेत. या पदांसाठी कोणतीही लेखी किंवा तोंडी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड शैक्षणिक कागदपत्रांमधील गुणांनुसार थेट केली जाईल.

निवड प्रक्रिया आणि अंतिम गुणवत्ता यादी

प्राथमिक निवड यादी 12 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी यादीतील माहिती तपासून घ्यावी. जर कोणाला आक्षेप असेल, तर त्यांनी 21 मार्च 2025 पर्यंत प्रकल्प कार्यालय, धानोरा येथे लेखी आक्षेप सादर करावेत. आक्षेप निकाली काढल्यानंतरच अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.

फसवणुकीपासून सावध रहा!

भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना किंवा आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये. कोणत्याही व्यक्तीकडून पद मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहार करू नयेत.

बालविकास प्रकल्प अधिकारी नीलिमा गेडाम यांनी सांगितले की, शासन निर्णयानुसार अंतिम गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी केल्यानंतरच निवड करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here