गडचिरोली : ५ हजारांची लाच स्विकारतांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

438

– पोलीस वर्तुळात खळबळ

The गडविश्व
गडचिरोली : आरोपी न करणे व अपघातातील मोटार सायकल परत देण्याकरिता ३० हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सोमजी सिडाम (५५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचा मद्दीगुडम मार्गावर दुचाकीची सामोरा समोर धडक बसल्याने अपघात झाला होता. त्याबाबत पोलीस स्टेशन अहेरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर आलापल्लीचे पोलीस उपनिरीक्षक सिडाम यांनी तक्रारदार यांना पोलीस चौकीमध्ये बोलावून सदर अपघातात आरोपी न करणे व मोटारसायकल परत करण्याकरिता ३० हजार रुपयांची मागणी केली. व पैसे न दिल्यास गुन्ह्यात आरोपी करण्यात येईल असे सांगितले. तक्रारदार यांची पोलीस उपनिरीक्षक सिडाम यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि गडचिरोली येथे तक्रार नोंदविली.
दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन करीत कारवाई केली असता ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ५ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारतांना आलापल्ली येथील पोलीस चौकीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिडाम यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सिडाम यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अहेरी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई नागपूर लाप्रवि चे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर ( अति.कार्यभार गडचिरोली) अविनाश भामरे, सफो प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना.राजेश पदमगिरवार, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकूर, चापोहवा तुळशीराम नवघरे सर्व लाप्रवि गडचिरोली व पोना रोशन चांदेकर, चापो राहुल तुमरेडी लाप्रवि चंद्रपूर यांनी केली.
सदर कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here