– पोलीस प्रशासन अनभिज्ञ की मूग गिळून गप्प?
The गडविश्व
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली (चेतन गहाणे) दि. २० : आरमोरी हे शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक सौहार्दासाठी ओळखले जाणारे शहर आज हळूहळू अवैध धंद्यांचं केंद्रबिंदू बनत आहे. तंबाखू विक्री, देशी-विदेशी दारूचा अवैध व्यापार, कोंबडा बाजार आणि आता सट्टा पट्टीचं जाळं आरमोरीच्या रग-रगात भिनू लागलं आहे. या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सोशल मीडियासारख्या प्रभावी माध्यमाचा सर्रास गैरवापर या सट्टा व्यवहारात सुरू आहे.
सट्टा खेळण्यासाठी आता मोबाईलचा वापर होतोय. व्हॉट्सॲप, टेलिग्राम यांसारख्या अॅप्लिकेशनच्या गुप्त ग्रुपवर आकडे पाठवले जातात, दर मिनिटाला भाव बदलतात, आणि पैशांचे व्यवहार UPI वरून थेट मोबाईलमधून होतात. हा आहे ‘डिजिटल सट्टा’ — जेथे खेळायचं म्हणजे फक्त एक मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन पुरेसं.
शहरातील दुर्गा मंदिर परिसर, पंचायत समिती परिसर, नेहरू चौक व काळागोटा – हे भाग खुलेआम सट्टा पट्टीचे अड्डे बनले आहेत. येथील लोक सांगतात, “सट्टा कधी थांबतच नाही… सकाळपासून रात्रीपर्यंत आकड्यांची चर्चा चालते.”

‘सट्टा किंग’चं दबदबा – कोणीच का वचकावं वाटत नाही?
शहरात ‘सट्टा किंग’ म्हणून ओळखला जाणारा एक प्रभावशाली इसम या सगळ्या व्यवहाराचं सूत्रधार आहे. स्थानिकांचे म्हणणं – “तो म्हणतो, कोणी काही करू शकत नाही!”मग प्रश्न आहे – याच्या पाठिशी कोण? राजकीय संरक्षण? पोलीस संगनमत?
पोलीस प्रशासनाचे मौन संशयास्पद
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र आरमोरीतील परिस्थिती पाहता असं वाटतं की पोलिसांनी फक्त आदेश वाचून ठेवले आहेत, कृतीच्या नावाने शून्य!
सट्टा व्यवसाय खुलेआम चालतो, तर पोलीस गाडी कुठेच फिरकते का नाही?
या डिजिटल सट्ट्याच्या विळख्यात आता युवक अडकले आहेत. फक्त मोबाईलवर आकड्यांचे अपडेट आणि “ओपन आला का?” “क्लोज काय गेला?” यासारख्या चर्चा तरुणांमध्ये सामान्य झाल्या आहेत.
पैशाच्या मोहाने अनेक जण शिक्षण, कामधंदा सोडून या दलदलीत अडकले आहेत. परिणामी, कुटुंबं उद्ध्वस्त होतायत, आणि समाज गळून चाललाय.
सोशल मीडियाचा चांगला वापरही शक्य!
ज्या सोशल मीडियाचा वापर आज सट्टा खेळण्यासाठी होतोय, त्याच माध्यमातून जनजागृती, शिक्षण, रोजगाराच्या संधी, मानसिक आरोग्य यासाठीही चांगला वापर होऊ शकतो. पोलीस विभागाने ‘सायबर गश्ती’ सुरू करावी, सामाजिक संस्था, पत्रकारांनी जनजागृती मोहीम राबवावी, शाळा-काॅलेजांमध्ये सायबर गुन्ह्यांवरील विशेष व्याख्यानं घ्यावीत.
शहराच्या सामाजिक आरोग्यासाठी आता नागरिक, सामाजिक संस्था आणि जबाबदार प्रशासनाने एकत्र यायला हवं. सट्टा, दारू, तंबाखू यांना थारा नाकारला तरच आरमोरीचं नाव पुन्हा गौरवाने घेतलं जाईल!
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilive #latestnews #breaking news
#आरमोरी_धंद्यांचं_हब #सोशल_मिडीयाचा_गैरवापर #सट्टा_किंग_कोणाचा #युवकांचं_भविष्य_धोक्यात