– असरअली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, १७ सप्टेंबर : सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा गावातील दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून दोन हातभट्ट्या उध्वस्त करीत दहा ड्रम गुळाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई असरअल्ली पोलिसांनी बुधवारी केली आहे. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाते आहेत. अवैध दारूविक्री विरोधात आवाज उठवून दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच गावातील एक-दोन ठिकाणी चोरट्या मार्गाने दारू गाळून विक्री करण्यासाठी गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. गाव संघटनेच्या महिलांनी यासंदर्भातील माहिती असरअल्ली पोलिसांना दिली. त्यानुसार असरअली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने, पोलिस पाटील व गाव संघटनेच्या महिलांनी गावातील दारूविक्रेत्यांच्या घरांची तपासणी केली. यावेळी दोन घरी सुरु असलेल्या हातभट्या उध्वस्त करण्यात आल्या. सोबतच दहा ड्रम गुळाचा सडवा, दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्य नष्ट करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
