भूसंपादनाच्या बळजबरीविरोधात ‘जमीन हक्क परिषद’

177

भूसंपादनाच्या बळजबरीविरोधात ‘जमीन हक्क परिषद’
– १८ मे रोजी भेंडाळा येथे शेतकरी कामगार पक्षातर्फे आयोजन
The गडविश्व
चामोर्शी, दि. ०६ : आगामी काळात जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी लाखो एकर खासगी शेतजमिनींचे भूसंपादन प्रस्तावित असून, हे भूसंपादन बळजबरीने झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात जाईल. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने १८ मे रोजी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे ‘जमीन हक्क परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
राज्यात सर्वात कमी शेती क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खाणी व उद्योग प्रकल्पांच्या नावाखाली शेतजमिनींच्या बळजबरी भूसंपादनाचा धोका निर्माण झाला आहे. पाचवी अनुसूची आणि संविधानाच्या तरतुदींकडे दुर्लक्ष करून सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे या परिषदेमध्ये या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा संघर्षाचा वारसा – राज्यात सेझ सारखे प्रकल्प रद्द करणे, रायगडात साडेबारा टक्के जमीन मिळवून देणे यासारख्या ऐतिहासिक लढ्यांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास बसलेला आहे. आता गडचिरोलीतही शेतजमिनी वाचवण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
या जमीन हक्क परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, महामार्ग बाधित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिगंबर कांबळे, वकिल आघाडीचे प्रमुख ॲड. देवेंद्र आव्हाड, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ.महेश कोपूलवार,जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, शामसुंदर उराडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
योग्य मार्गाने आपल्या जमीनी वाचवू इच्छिणाऱ्या व भूसंपादन प्रक्रीयेत उचित न्यायाची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांनी या जमीन हक्क परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे रमेश चौखुंडे, संजय दुधबळे, डाॅ. गुरूदास सेमस्कर, पवित्र दास, प्रभाकर गव्हारे, गोविंदा बाबनवाडे, दामोदर रोहणकर, राजू केळझरकर, मारोती आगरे, भैय्याजी कुनघाडकर, विजय राऊत व शेतकऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here