– परिसरात खळबळ
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ११ : जून महिन्यापासून बेपत्ता असलेल्या येरकड (ता. धानोरा) येथील विजय कस्तुरे (वय ४३) याचा मृतदेह अखेर आज चवेला रोडवरील स्मशानभूमीजवळच्या जंगलात सागाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.गुरे राखणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनास मृतदेह येताच धानोरा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.
माहितीनुसार, विजय कस्तुरे १८ जून रोजी आपल्या पत्नी आणि मुलासह धानोरा येथे बँकेत गेला होता. पैसे काढल्यानंतर पाचशे रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम पत्नीला दिली. “मी थोडा फिरून येतो,” असे सांगून तो निघून गेला आणि त्यानंतर तो परतलाच नाही. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच ठसे लागले नाहीत. अखेर धानोरा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.
आज, तब्बल २४ दिवसांनंतर त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
विजय कस्तुरे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुमित चेवले करीत आहेत.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Dhanora #DeadBodyFound #HangingCase #MissingPerson #Gadchiroli #PoliceInvestigation #SuicideOrMurder #Yerakda #ForestIncident #BreakingNews
#धानोरा #मृतदेह #गळफास #बेपत्ता #गडचिरोली #पोलीसतपास #आत्महत्या_की_हत्या #येरकड #BreakingNews #गावबातमी