– कुंभीटोला गाव संघटनेची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑगस्ट : कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील दारूविक्रेत्यांवर कारवाई करून अवैध दारूविक्रीचा व्यवसाय बंद करावा, अशी मागणी कुंभीटोला गाव संघटनेच्या महिलांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदनासह गावातील दारूविक्रेत्यांची यादी कुरखेडा पोलिस निरीक्षकांना सादर करण्यात आले.
कुंभीटोला गावामध्ये काही वर्षांपासून अवैध दारूविक्री सुरु आहे. दारूच्या आहारी जाऊन युवापिढी बिघडत चालली आहे. गावात भांडण-तंट्याच्या प्रमाणात वाढ झाली असून महिलांना त्रास सहन करावे लागत आहे. गावातील महिला-पुरुषांनी यापूर्वी दारूविक्री बंदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी कुरखेडा पोलिस स्टेशनला भेट देऊन आपली समस्या मांडली. तसेच गावातील दारूविक्रेत्यांची यादी देऊन कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित बिट अंमलदारांना कुंभीटोला गावातील अवैध दारूविक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी तंमुस अध्यक्ष किशोर भांडारकर, गाव संघटनेच्या शेवंता हलामी, प्रेमीला गावळे, चंद्रकला गावळे, मुक्तीपथ तालुका उपसंघटक मयुर राऊत यांच्यासह गाव संघटनेच्या महिला व युवक उपस्थित होते.
