– आंदोलन करून दीड महिना लोटूनही अद्याप वैनगंगा नदीपुलावर कठडे न लावल्याने लोकहीत संघर्ष समिती आरमोरीचा इशारा
The गडविश्व
आरमोरी : गडचिरोली – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे सन २०२० ला आलेल्या महापुरात वाहून गेले होते त्यामुळे अपघात होण्याची खूप मोठी शक्यता होती. सातत्याने दोन वर्ष पत्रव्यवहार करून सुद्धा याकडे लक्ष देण्यात आले नाही त्यामुळे २ फेब्रुवारी २०२२ ला वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे त्वरित लावण्यात यावे यासाठी लोकहित संघर्ष समिती, आरमोरी तर्फे वैनगंगा नदीच्या काठावर ठिय्या आंदोलन करण्यात आले व ८ फेब्रुवारी २०२२ ला चक्कजाम आंदोलन सुद्धा करण्यात आले. या चक्काजाम आंदोलनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या काहीच दिवसात वैनगंगा नदीचा पुलावरील कठडे लावून देण्यात येतील असे आश्वासन सुद्धा दिले मात्र दीड महिना लोटून सुद्धा अजून पर्यंत वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे लावण्यात आलेले नाही व या विषयी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता थातुरमातुर उत्तर देण्यात येत आहे. त्यातच गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे नसल्यामुळे नागरिकांना जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे व आणखी किती लोकांचे जीव जाण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग बघणार असा प्रश्न लोकहित संघर्ष समिती,आरमोरी तर्फे विचारण्यात येत आहे. ६ एप्रिल २०२२ पर्यंत वैनगंगा नदीच्या पुलावरील कठड्याचे काम पूर्ण न झाल्यास नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा लोकहीत संघर्ष समिती आरमोरी तर्फे देण्यात आलेली आहे.
