The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, २८ ऑगस्ट : तालुक्यातील लेखा येथील कक्ष क्रमांक ५१० सागवन प्लाँनटेशन येथे बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने व
प्राप्त माहितीनुसार, शनिवार २७ ऑगस्ट रोजी वनरक्षक कुमारी वाय. पी. राऊत नियत वनरक्षक तुकुम कक्ष क्रमांक ५१० मध्ये गस्त करीत असतांना नर बिबट मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती वरिष्ठांना तात्काळ देण्यात आली. माहिती मिळताच क्षेत्र सहाय्यक धानोरा, वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा, सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा मोका पंचनामा केला. सदर घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने व पंचनामाकरिता बराच वेळ झाल्यामुळे मृत बिबट्याचे शवविच्छेदन करता आले नाही. त्यामुळे मृत बिबट शासकीय वाहनाने वनपरिक्षेत्र कार्यालय धानोरा येथे आणून सुरक्षित ठिकाणी ठेवले व आज रविवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी गडचिरोलीचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या उपस्थितीत डॉ. रोहन गालफाडे, डॉ. लक्ष्मीकांत ढगारे, डॉ. देविदास लोखंडे पशुधन विकास अधिकारी यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. यावेळी वन्यजीवप्रेमी अजय कुकुडकर हे हजर होते.
बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे कारण कळू शकणार आहे. बिबट्याला विक्री डेपो धानोरा येथे अग्नी देण्यात आली. पुढील तपास गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके व दक्षिण धानोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी केळवतकर हे करीत आहेत.
