– बस मध्ये होते ३५ प्रवासी, अचानक पेट घेतल्याने उडाली खळबळ
The गडविश्व
यवतमाळ : धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे घडली . यवतमाळ जिल्ह्यातील शिळोना-फोपाळी घाटात ही घटना घडली आहे. ही एसटी बस पुसद आगाराची असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. पुसद आगाराची ही बस नांदेड करिता जात असताना बसने अचानक पेट घेतला.
एम.एच ४०- ६१७० क्रमांकाची पुसद आगाराची बस पुसदवरून नांदेड करीता निघाली होती. दरम्यान पोफाळीच्या शिळोणा घाटात अचानक बसच्या समोरच्या भागाला आग लागली. या बसमध्ये एकूण ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमुळे वाहनाचा समोरचा भाग पूर्णतः जळाला आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूनी वाहतूक मोठ्या प्रमाणत विस्कळित झाली.
एसटी बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली आणि त्यानंतर गाडीतून सर्व प्रवासी, चालक, वाहक बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या घटनेत एसटी बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनीही मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

— News18Lokmat (@News18lokmat) March 27, 2022