कुरखेडा : संशयास्पद अवस्थेत आढळला इसमाचा मृतदेह

848

– परिसरात खळबळ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा,१ ऑक्टोबर : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी मार्गावर एका इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी उघडकीस आली.सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भिवा नवलु कुमरे (४५) रा. अरततोंडी असे मृतक इसमाचे नाव आहे.
कुरखेडा पासून काही अंतरावर असलेल्या गेवर्धा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नजीक गेवर्धा-अरततोंडी बायपास मार्गावर सदर मृतदेह आढळला. विशेष म्हणजे मृतकाची सायकल अंदाजे ४०० मीटर अंतरावर झाडाला टेकून होती. त्यामुळे अपघात झाला असल्याचा अंदाज असून घातपाताचीही शक्यता नाकारता येत नाही. मृतक इसम हा कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भाचीची भेट घेण्यास गेले होते अशी माहिती आहे. परतत असतांना रात्रीच्या सुमारास घरी परतला नाही. सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना गंभीर जखमा असलेला मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला. ज्या मार्गावर मृतदेह आढळून आला त्या मार्गावरून रात्रीच्या सुमारास रेतीची तस्करी होत असल्याची माहिती आहे त्यामुळे हा अपघात असावा असा अंदाज आहे. मात्र त्यांची सायकल झाडाला टेकुवन सुव्यवस्थित आढळुन आल्याने घातपाताचीही शक्यता असून प्रकरण संशयास्पद आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. अधिक तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here