– आदिवासी साहित्यीक व कवी वाहरू सोनवणे यांचे प्रतिपादन
The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑगस्ट : आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, संस्कृतीचे रक्षण व्हावे, त्यांचा जल-जंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, हक्क आणि अधिकाराची ओळख, सामाजिक ऐक्य, अस्तित्व, स्वाभिमान, आत्मसन्मान, अस्मिता, कायम राहावी तसेच त्यांचे जे जीवन , पंरपरा, मुल्ये आहेत जी इतरांना समजावी यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन नंदुरबार येथील आदिवासी साहित्यीक व कवी वाहरू सोनवणे यांनी केले. आदिवासी संशोधन व विकास केंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे आयोजित एक दिवसीय व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विषय होता ‘आदिवासी संस्कृती, इतिहास व बोलीभाषा’. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, आदिवासी संशोधन व विकास केंद्राचे समन्वयक वैभव मसराम आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले , स्वातंत्र्यांचे ७५ वर्ष साजरे करताना आदिवासी स्त्रियांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका वठवली, याविषयी अनेक उदाहरणे देत आदिवासी स्त्रियांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, आदिवासी समुदाय हा जंगलामध्ये वसलेला आहे .खऱ्या अर्थाने या सृष्टीचे आणि वनांमध्ये असलेल्या वनौषधीचे ज्ञान आणि जतन आदिवासी करत असतात. नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याची त्यांची भूमिका असते त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पीढीने त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे ते आपल्या मनोगतात म्हणाले.
या कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व संविधानिक अधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे संचालन वैभव मसराम यांनी तर आभार डॉ. रजनी वाढई यांनी मानले.
